असे जगावे मराठी कविता इयत्ता सातवी | ase jagave kavita
असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर!
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर!
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना
संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर!
करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !
कवी गुरू ठाकूर
0 Comments